अर्धवट ज्ञान हीच अर्धवट दरिद्री!
काही दिवसांपूर्वी म्हणजेच ७ ऑक्टोबर २०१७ रोजी आळंदीला जाण्याचा योग आला होता. नेहमीच्याच सवयीप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच दर्शन झाल्यावर पुस्तकांच्या दुकानात रमून गेलो. तिथे मला दीपकने सुचविलेले १९३१ साली प्रकाशित ह. भ. प. निवृत्ती वक्ते महाराज लिखित श्री मुक्ताबाई चरित्र मिळालं. त्या ग्रंथाच्या चटकन दोन प्रत विकत घेऊन त्यातील एक प्रत मी दीपकला त्याच्या घरी नेऊन दिली आणि त्याच्याकडून माघारी येताना वाघोलीला नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे वाघेश्वराचं दर्शन घ्यायला निघालो असता पावसाने हजेरी लावलीच! कसाबसा मंदिराच्या बाहेर चपला काढून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन मी सभामंडपात स्थिरावलो. परतीचा पाऊस इतका प्रचंड होता की तो इतक्यात काही थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. तेवढ्यात माज्या ध्यानात आलं की माज्या जवळ ग्रंथ आहे वाचायला, मग काय झालंच! माझी तिथेच वाचनाची बैठक सुरू झाली. सर्व काही भान विसरून मी ग्रंथ वाचण्यातच मग्न झालो. काही वेळाने पावसाच्या सरींचा आवाज कमी झाला म्हणून सहज घड्याळात पाहिलं तर रात्रीचे १० वाजले होते म्हणजे मी सलग तीन तास मंदिरात ग्रंथ वाचत होतो आणि एवढा वेळ देऊन सुद्धा माझं...