परसबाग आणि सेंद्रिय शेतीचा बोलबाला

आज सकाळी उठल्या उठल्या हातात The Hindu वृत्तपत्र घेतलं आणि त्याच्या पहिल्याच पानावर खालील बाजूला एक विशेष बातमी होती आणि तिचं नाव होतं *"A rooftop farmer rises with rice"* कर्नाटकातील मंगळुरु येथील एका प्राध्यापकाने आपल्या बालकणी मधील १२०० चौरस फूट परसबागेत तांदूळ, हळद आणि इतर फळभाज्यांचं उत्पादन घेऊन स्वतःच्या घरासाठी वापरलं. त्यासाठी प्राध्यापकांनी सेंद्रिय खताचा वापर केला. आजकाल परसबाग शेतीच खूपच फॅड आलाय. कुंडीत वांगी, कुंडीत टोमॅटो वेगेरे. आमच्या पुण्यात तर परसबाग साठी शेकडो पुस्तके मिळतात.

माझं तर स्पष्ट मत आहे की परसबाग एक नौटंकी आहे त्यामुळे कोणता व्यक्ती स्वयंपूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला शेतकरी आणि त्याची शेती फायद्यात आणली पाहिजे तेव्हा कुठे पेट्रोकेमिकल विरहित भाजीपाला तुम्हाला मिळू शकतो. यावरून मला काही प्रश्न पडले आणि लोकांना सुद्धा नेहमी पडतात. परसबागेतील पिकाचा उत्पादन खर्च हा निश्चितच शेतातील उत्पादनखर्च पेक्षा जास्तच असणार, परंतु भांडवल आहे आणि एक छंद किंवा रासायनिक खत विरहित पिकं म्हणून ते प्राध्यापक त्याच उत्पादन घेत असावेत. परंतु हे करत असताना सामान्यतः शहरी लोकांची नेहमीच एक बोंबाबोंब असते की शेतकरी हा पिकाला सेंद्रिय खते वापरण्या ऐवजी अतिप्रमाणात रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरतो त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या लोकांना ओरडायला काय जातंय म्हणा!

पूर्वी एक क्विंटल कापूस विकून शेतकरी एक तोळा सोनं घेऊन घरी जात होता आणि आज १० क्विंटल कापूस विकला तरी एक तोळा सोनं खरेदी करू शकत नाही शेतकरी. काही लोक शेतकऱ्याला फुकटचा सल्ला देतात की शेतकऱ्याने गाई म्हशी पाळल्या पाहिजेत त्याच खत शेताला वापरलं पाहिजे. बरं, असो पण जनावरे विकत घ्यायला कोण अनुदान देणार याच उत्तर सुद्धा त्यांच्याकडे नसत. एका महाशयाला हा प्रश्न विचारला असता त्याने म्हैस घ्यायला परवडत नसेल तर वासरू घ्या स्वस्त मिळेल पण सेंद्रिय शेती करा हा अजब सल्ला दिला. त्याचं लाखमोलाच उत्तर ऐकून मी चर्चा आणि माझा मोबाईल तातडीने बंद करून झोपून घेतलं. शहरी लोकांमध्ये सेंद्रिय शेतीच अन्नधान्य खाण्याची फॅशन आलीये परंतु थोडी शेतमालामध्ये भाववाढ झाली की आकाश पातळ एक करून गळे काढणारे सुद्धा हेच सेंद्रियवाले लोक.

शेतकरी आज बेजार झालाय शेतीत कोणतही तंत्रज्ञान किंवा संकरित बियाणे पेरली तरी त्याची शेती तोट्यात आहे. माज्या आजोबांनी त्यांच्या हयातीत नेहमी आधुनिक तंत्रज्ञानमध्ये पाण्यासाठी ऑइल पंप, किटकनाशकांसाठी फवारणी यंत्र, पेरणीसाठी आधुनिक अवजारे व संकरित बी बियाणे आणि शेतमाल विक्री साठी मोठी बाजारपेठ यांचा वापर केला तरी आयुष्याचा शेवटचा श्वास घेताना ते एक तोट्यातील शेतकरीच होते. हाच एक प्रश्न मला नेमका सतावतो की एवढं करून सुद्धा जर शेती फायद्यात येत नसेल तर शेतकऱ्याने नेमकं करावे तरी काय?

शेतकऱ्याच्या शेतमालाला रास्त हमीभाव भेटत नाही म्हणून तो रासायनिक खते वापरून उत्पादन खर्च कमी करून शेती फायद्यात आणण्याचा सतत प्रयत्न करत राहतो. या सर्व प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं ते फक्त शरद जोशी यांनीच! आणि या सर्वांच एकमेव उत्तर होत *शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव, ऋण अनुदान, उलट पट्टी* तुम्ही शेतमालाला हमीभाव द्या मग पहा शेतकरी दर्जेदार उत्पादन काढतो की नाही. गरीब शेतकऱ्यांचं भांडवल सुद्धा वसूल होत नाही असे जर बाजारभाव असेल तर कुठून तो शेतकरी गाय म्हैस पाळून सेंद्रिय शेती करत राहणार? शेतमालाला रास्तभाव ही एक कलमी मागणी जर सरकारने लागू केली तर निश्चितच देशाच्या निर्यात धोरण आणि उत्तम आरोग्यसंपदा यात शेतीचा मोठा वाटा झाल्या शिवाय राहणार नाही.

#पंकज_गायकवाड
#माझी_लेखणी
#परसबाग_आणि_सेंद्रिय_शेतीचा_बोलबाला
https://www.PankajSGaikwad.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सुरेशचंद्र म्हात्रे सर

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

अध्यात्म आणि समुपदेशन