अर्धवट ज्ञान हीच अर्धवट दरिद्री!

काही दिवसांपूर्वी म्हणजेच ७ ऑक्टोबर २०१७ रोजी आळंदीला जाण्याचा योग आला होता. नेहमीच्याच सवयीप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच दर्शन झाल्यावर पुस्तकांच्या दुकानात रमून गेलो. तिथे मला दीपकने सुचविलेले १९३१ साली प्रकाशित ह. भ. प. निवृत्ती वक्ते महाराज लिखित श्री मुक्ताबाई चरित्र मिळालं. त्या ग्रंथाच्या चटकन दोन प्रत विकत घेऊन त्यातील एक प्रत मी दीपकला त्याच्या घरी नेऊन दिली आणि त्याच्याकडून माघारी येताना वाघोलीला नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे वाघेश्वराचं दर्शन घ्यायला निघालो असता पावसाने हजेरी लावलीच!

कसाबसा मंदिराच्या बाहेर चपला काढून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन मी सभामंडपात स्थिरावलो. परतीचा पाऊस इतका प्रचंड होता की तो इतक्यात काही थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. तेवढ्यात माज्या ध्यानात आलं की माज्या जवळ ग्रंथ आहे वाचायला, मग काय झालंच! माझी तिथेच वाचनाची बैठक सुरू झाली. सर्व काही भान विसरून मी ग्रंथ वाचण्यातच मग्न झालो. काही वेळाने पावसाच्या सरींचा आवाज कमी झाला म्हणून सहज घड्याळात पाहिलं तर रात्रीचे १० वाजले होते म्हणजे मी सलग तीन तास मंदिरात ग्रंथ वाचत होतो आणि एवढा वेळ देऊन सुद्धा माझं फक्त अर्धचं वाचन पूर्ण झालं होतं.

सर्व काही उरकून घरी जायला निघालो आणि मी लगबगीने मंदिरा बाहेर आलो. बाहेर येऊन पाहतो तर काय माझी डाव्या पायाची चप्पल हरवली होती. अंधारामुळे नजरचुकीने कोणीतरी माझ्या एका पायाची चप्पल घालून गेलं होतं. रात्रीचे दहा वाजले होते, नुकताच पाऊस थांबला होता आणि बाहेर काळाकुट्ट अंधार असल्याने मी चप्पल शोधण्यात वेळ ना घालविता उजव्या पायात एक चप्पल घालून तसाच घरी जायला निघालो. निघण्यापूर्वी घरी आईला एक कॉल करून सर्व हकीकत सांगून घरी पोहोचायला उशीर होईल असं कळवलं.

निघताना मात्र आईच नेहमीचं एक वाक्य आठवलं,"मंदिरातून चप्पल चोरीला जाणे म्हणजे आपली दरिद्री निघून जाण्यासारखं आहे". त्यामुळे मनातल्या मनात थोडा सुखावलो होतो की माझी दरिद्री गेली असणार. परंतु अचानक लक्षात आलं की माझी तर फक्त एकाच पायाची चप्पल हरवली आहे! दुसरी तर माज्याच पायात आहे. मग माझी अर्धीच दरिद्री गेली की काय? आणि अर्धी दरिद्री माज्याच सोबत अजूनही आहे. उजव्या पायात एकुलती एक चप्पल घालून, पावसाच्या तुरळक सरी झेलत गाडी चालवत होतो. आणि मनात मात्र वाचलेला ग्रंथ व माझी हरवलेली चप्पल एवढाच विचार करत घराकडे निघालो होतो.

निसर्ग आपल्याला आपल्या सभोवताली वेळोवेळी विशिष्ट संकेत देत असतो. त्यातून आपण काय संदेश घेतो यावर आपलं भवितव्य अवलंबून राहतं. मी मंदिरात अर्धा ग्रंथ वाचला म्हणजेच मला अर्ध ज्ञान मिळालं म्हणून माझी एकचं चप्पल हरवली. माज्या आईच्या भाषेत सांगायचं झालं तर माझी फक्त अर्धीच दरिद्री गेली होती आणि अर्धी माज्याच सोबत आहे. यदा कदाचित जर पूर्ण ग्रंथ वाचून पूर्ण ज्ञान मिळालं असतं तर माज्या दोन्ही चपला हरवून माझी पूर्ण दरिद्री गेली असती.

या घटनेवरून निसर्गाने मला खूप सुंदर संदेश दिलाय की, "तुमचं संपूर्ण ज्ञान हेच तुमच्या दरिद्र्याचा पूर्णपणे अंत करू शकते परंतु तुमचं अर्धवट ज्ञान किंवा अज्ञान हे तुमच दारिद्र्य घालवू शकत नाही".

घरी पोहोचायला रात्रीचे साडे अकरा वाजले होते. आईने दरवाजा उघडला, मी घरात गेलो आणि त्याच क्षणी माज्या एकाच पायातील चप्पल पाहून अपेक्षेप्रमाणे आई बोलली की ,"अरे, ही अर्धवट दरिद्री घरी कशाला घेऊन आलास! तिकडेच सोडायची ना ही सुद्धा चप्पल!"

#अर्धवट_ज्ञान_हीच_अर्धवट_दरिद्री!
#माझी_लेखणी
https:\\PankajSGaikwad.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सुरेशचंद्र म्हात्रे सर

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

अध्यात्म आणि समुपदेशन