डायरी

माज्या अगदी जवळच्या परिचयाचे एक उद्योजक आहेत. त्यांची आणि माझी मैत्री काही वर्षांपासूनची आहे. ते माज्या वडिलांच्या समवयस्क आहेत. त्यांना त्यांच्या कारखान्यात कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आली की ते फक्त दोन व्यक्तींना कॉल करतात त्यापैकी एक मी असतो. त्या काकांना माज्या विषयी फार काही ठाऊक नाही. फक्त एक हुशार अभियंता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत काम करणारा मुलगा एवढीच त्यांना माझी ओळख. त्याव्यतिरिक्त माज्याबद्दल त्यांना काही ठाऊक नाही आणि मीसुद्धा स्वतःहून माज्याबाबत कधी जास्त व्यक्त देखील झालो नाही. ते नेहमी मला उद्योगा क्षेत्र, त्यातील आव्हाने, त्रुटी, समस्या, आर्थिक व्यवस्थापन आणि बारकावे बाबत माहिती देत असतात. नेहमीच्या कामाव्यतिरिक्त ते कधी कधी कौटुंबिक गप्पा सुद्धा मारत असतात. एक दिवस मला त्यांचा कॉल आला की आपल्याला सर्व Clients, Vendors, Supplier यांना नवीन वर्षाच्या डायरी द्यायच्या आहे. मी तुला नावाची यादी पाठवली आहे, मला फक्त स्टिकरच्या format मध्ये बसवून दे. त्यांनी सांगितल्या प्रमाणे मी सर्व व्यवस्थित बनवून दिलं. काही दिवसांनी परत त्यांचा रात्री उशिरा कॉल आला की मेल आणि GST बिलिंगचा issue झाला आहे, उद्या सकाळी येऊन बघ जरा.

मी वेळेत पोहोचलो आणि सर्व काम उरकून घेतलं त्यानंतर मला विचारलं की, "पंकज, तू काही लिहितोस का रे?" मी उत्तरलो की "हो, थोडं थोडं लिहीत असतो" मी मनातल्या मनात हसलो कारण त्यांना ठाऊक नव्हते की मी नेहमीच लिखाण करतो. त्यांनी एक नवी डायरी माज्या हातात दिली आणि म्हणले "ही तुला घे डायरी. पण तू काही लिहीत असेल तरच घे. उगाच माझी एक डायरी वाया घालवू नकोस." मला काही क्षण स्वतःचचं कौतुक वाटू लागलं कारण माझी माज्या लेखणी मुळे असलेली सामाजिक ओळख मी त्यांना इतक्या वर्षात समजू दिली नव्हती. अगदी आम्ही सोशल मीडियावर सुद्धा एकमेकांना जोडलेलो नाहीये. त्यांची आणि माझी फक्त व्यावसायिक आणि कॉर्पोरेट ओळख होती. तितक्यात नुकत्याच पास झालेल्या दोन अभियांत्रिकीच्या मुली मुलाखत देण्यासाठी आल्याने त्यांनी मला एक छोटं काम सांगून स्वतः मुलाखत घेण्यासाठी निघून गेले.

थोड्या वेळापूर्वी मला माझं कौतुक वाटतं होत. पण काम करत असताना मला आता माझाच राग येऊ लागला होता. कारण मी रोज वेगवेगळ्या भूमिकेत वावरत असतो या गोष्टीचा मला पूर्वी अभिमान वाटायचा पण त्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात कधीही भरून ना येणारे नुकसान झाले आहे याची अचानक जाणीव होऊ लागली. माज्या वैयक्तिक आयुष्यात अनेक नातेवाईक, मित्र, मैत्रिणी आणि त्याहून जवळची प्रेमाची माणसे आहेत, काही होती. वैयक्तिक आयुष्यातील लोकांपासून मी माझं कॉर्पोरेट, सामाजिक आणि औद्योगिक आयुष्य नेहमीच दूर ठेवले. वैयक्तिक आयुष्यातील व्यक्तींना इतर तीन आयुष्यातील पंकज ठाऊकच नाही. यामुळे त्यांना कधी मी वेळ देऊच शकलो नाही तसेच मी त्यांना का वेळ देऊ शकलो नाही याचं कारण सुद्धा एक कधी समजू दिलं नाही आणि मग हळूहळू सर्व माणसे दुरावत गेली.

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सामाजिक आयुष्यात म्हणजे शेतकरी चळवळीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर असंख्य लोकं जोडत गेलो. शेतकरी चळवळीत काम करण्याऱ्या पंकजची कीर्ती सर्वदूर पोहोचत होती पण इतके वर्ष वैयक्तिक आयुष्यात जोडलेल्या माणसांना वेळ देऊ शकत नसल्याने क्रमाक्रमाने कमी होत गेली. कमी होत गेली म्हणण्या ऐवजी त्यांनी मला त्यांच्या प्राधान्य क्रमातूनच बाजूला केले अस म्हणलं तर नक्कीच योग्य ठरेल. सामाजिक आयुष्यातील मित्र परिवाराला पंकजचं खाजगी वैयक्तिक आयुष्य कसं आहे, पंकज लिखाण आणि वाचनव्यतिरिक्त काय करतो याबाबत सुद्धा काही कल्पना नाही किंवा त्यांना त्याबाबत मी कधी माहिती सुद्धा दिली नाही.

कॉर्पोरेट क्षेत्रामधील माझी अवस्था सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातून काही निराळी नाही. अगदी बोटावर मोजण्या इतके लोकं सोडले तर कोणीच सांगू शकत नाही की माझं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य कसं आहे. स्वतःच काम जबाबदारीने कधी चुका करत तर कधी सुधारवत करणारा पंकज याहून जास्त माझी ओळख कोणालाच नाही. चार वर्षांपासून माझं अस कामाच्या ठिकाणी फक्त कामापूरती ओळख मांडण्याचं काम अविरत सुरू आहे.

पण काही दिवसापासून या चक्रात बिघाड झाल्यासारखे जाणवू लागलंय. कॉर्पोरेटमध्ये तणाव वाढला की त्याचा राग वैयक्तिक आयुष्यात निघतोय, वैयक्तिक आयुष्यातील तणावाचा परिणाम कॉर्पोरेट आणि सामाजिक आयुष्यावर घडतोय. आणि या तणावाचे जे माज्यामुळे बळी ठरत आहेत त्यांना देखील खरं कारण उमजत नसल्याने ते सर्व लोकं माज्या पासून दूर राहणेच पसंद करू लागलेत. अगदी काही दिवसांपूर्वी माझा बालमित्र मला बोलला की मी माज्या मनाची समजूत घातली होती की पंकज आपला कोणीतरी मित्र होता हा भूतकाळ समजून तुला कायमचा विसरून देखील जाण्याची तयारी केली होती इतका तू दूर गेला होतास. काही वर्षांपूर्वी काही मित्र मैत्रिणी सोबत देखील माझे मतभेद झाले पण मी ते दूर करण्यात कधी रस दाखवलाच नाही. परिणामतः आज ते सर्वजण माज्या पासून दूर आहेत. तसं पाहता ते सर्व त्यांच्या जागी योग्य होते आणि आजदेखील आहेत. मतभेद असणं हे तर जिवंतपणाच लक्षण आहे. पण त्याकडे गरज असताना दुर्लक्ष केलं तर मात्र संहार हा निश्चितच असतो. पण मी वैयक्तिक आयुष्यात काहीतरी बिनसतंय असं दिसतं असताना देखील ते मिटवण्याऐवजी माज्या कॉर्पोरेट आणि सामाजिक आयुष्यात व्यस्त राहणे पसंद केले आणि चांगल्या जिवाभावाच्या मित्र परिवाराचा सहवास हळूहळू गमावून बसलो. त्या सर्वांना आजही माज्याबद्दल कदाचित जिव्हाळा असावा असं मला वाटतं परंतु मला त्या सर्वांबाबत आजही मनात पूर्वी इतकंच प्रेम आहे फक्त माझी गाडी वेळेत सुटली आणि मला पोहोचायला क्षणभर उशीर झाला इतकीच आता भावना उरलेली आहे.

वैयक्तिक आयुष्य, सामाजिक आयुष्य आणि कॉर्पोरेट आयुष्याला एकमेकांपासून वेगळे ठेऊन त्यांच्यात समान अंतर ठेवून जगताना पुढे जाऊन इतकी विदारक स्थिती निर्माण होऊ शकते याबाबत कधी स्वप्नात सुद्धा अंदाज केला नव्हता. या तिन्ही आयुष्याची एकमेकांत योग्य ती सांगड असणे गरजेचे वाटू लागलं आहे.  सहा वर्षांपूर्वी मला रोजच्या रोज डायरी लिहिण्याची सवय होती. पण माज्याच डायरी मुळे दोन वेळा वाद उदभवल्यामुळे मी अचानक लिहिणे बंद करून दोन वर्षांच्या डायरी नदीत विसर्जित करून टाकल्या होत्या. आज कुठेतरी त्या पुन्हा सुरू करण्याची गरज वाटू लागली आहे. कदाचित मला आज खूप उशीर झाला आहे पण पुर्वी सारखे सोनेरी दिवस पहायचे असतील तर चुका शोधून समजून त्या दुरुस्त करण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करण्यात काही गैर नाही असं मला आजही वाटतंय.

एव्हाना त्या दोन मुलींच्या मुलाखती संपल्या होत्या. काकांनी माज्यासमोर दोन्ही मुलींचे CV आणून ठेवले. कोणत्या मुलीची कामासाठी निवड केली आणि कोणत्या मुलीला निवडलं गेलं नाही याबाबत त्यांनी मला विस्ताराने समजावून सांगितले. माझंही काम उरकलं होतं. मग त्यांनी मला भेट दिलेली डायरी पटकन उचलली आणि घरी जायला निघालो. घरी आल्यावर मी सहज डायरी उघडली आणि त्यातील ०१ जानेवारी २०१९ च्या पानाच्या खालील बाजूला लिहिलेला एक सुविचार नजरेत पडला. आणि इतका वेळ माज्या मनात सुरू असलेल्या घालमेल आणि वैचारिक द्वंद्वाला तो सुविचार उत्तर देऊन माझा आत्मविश्वास वाढवत राहिला.

Cheers to a new year and another chance for us to get it right.
-Oprah Winfrey



Comments

Popular posts from this blog

सुरेशचंद्र म्हात्रे सर

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

अध्यात्म आणि समुपदेशन