सुरेशचंद्र म्हात्रे सर
२३ सप्टेंबर, म्हात्रे सरांचा जन्म वाढदिवस. म्हात्रे सरांना शुभेच्छा नेमक्या कशा स्वरूपात द्याव्यात हाच माज्यापुढे पडलेला प्रश्न आहे कारण मला त्यांची आदरयुक्त अपार भीती वाटते. सरांसोबत संवाद साधताना आपण प्रत्यक्ष ग्रंथालयासोबत चर्चा करत असल्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. माझा मामेभाऊ महेश आणि मी सर्वप्रथम अंगारमळ्यात ३ सप्टेंबर २०१७ रोजी गेलो होतो. प्रशिक्षण शिबिरात फेरफटका मारत असताना म्हात्रे सरांसोबत भेट झाली त्यांनी आमची प्रेमाने चौकशी केली आणि संवाद साधताना मी सहजपणे बोलण्याच्या ओघात मी एका व्यक्तीचं नाव घेऊन विचारलं की यांनी संघटना का सोडली? त्यानंतर सरांची मुद्रा अचानक बदलली आणि मला उत्तरले की हा प्रश्न तू त्या व्यक्तीला जाऊन विचारला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर मी कसा देऊ शकतो? मग मी अचानक भानावर आलो की मी किती उथळ प्रश्न विचारला आणि मला पूर्ण दिवसभर चुकल्या सारखं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी सर व्याख्यानमालेत भेटले आणि पुन्हा त्यांनी आमची आपुलकीने चौकशी केली. तेव्हा मात्र मनावरील साचलेलं भीतीचं मळभ नकळत हलकं झालं. म्हात्रे सरांचं स...