सुरेशचंद्र म्हात्रे सर
२३ सप्टेंबर, म्हात्रे सरांचा जन्म वाढदिवस. म्हात्रे सरांना शुभेच्छा नेमक्या कशा स्वरूपात द्याव्यात हाच माज्यापुढे पडलेला प्रश्न आहे कारण मला त्यांची आदरयुक्त अपार भीती वाटते. सरांसोबत संवाद साधताना आपण प्रत्यक्ष ग्रंथालयासोबत चर्चा करत असल्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. माझा मामेभाऊ महेश आणि मी सर्वप्रथम अंगारमळ्यात ३ सप्टेंबर २०१७ रोजी गेलो होतो. प्रशिक्षण शिबिरात फेरफटका मारत असताना म्हात्रे सरांसोबत भेट झाली त्यांनी आमची प्रेमाने चौकशी केली आणि संवाद साधताना मी सहजपणे बोलण्याच्या ओघात मी एका व्यक्तीचं नाव घेऊन विचारलं की यांनी संघटना का सोडली? त्यानंतर सरांची मुद्रा अचानक बदलली आणि मला उत्तरले की हा प्रश्न तू त्या व्यक्तीला जाऊन विचारला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर मी कसा देऊ शकतो? मग मी अचानक भानावर आलो की मी किती उथळ प्रश्न विचारला आणि मला पूर्ण दिवसभर चुकल्या सारखं वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी सर व्याख्यानमालेत भेटले आणि पुन्हा त्यांनी आमची आपुलकीने चौकशी केली. तेव्हा मात्र मनावरील साचलेलं भीतीचं मळभ नकळत हलकं झालं.
म्हात्रे सरांचं संघटनेच्या सर्व पाईकांवर बारकाईने लक्ष होत याची मला वेळोवेळी प्रचिती आली. चुकीच्या गोष्टींवर सर अचूकपणे बोट ठेवतात आणि एखादी गोष्ट पटली तर तिथेही कौतुक करायला कधीच विसरत नाहीत. २८ डिसेंबर २०१७ रोजी श्री सुरेश डावरे या शेतकरी आंदोलकाने आत्महत्या केल्याची बातमी वॉट्सअप्प ग्रुपवर आली. त्यावर मी प्रतिक्रिया दिली की, "आपल्याला आता आत्मचिंतानाची वेळ आली आहे". हे वाचून सरांनी मला १ जानेवारी २०१८ रोजी सकाळी कॉल करून "विशेष शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला आहे" असं म्हणाले . मी काही वेळ भेदरून गेलो की सर मला शालजोडे तर मारत नाहीत ना! मग सरांनी सांगितले की तुजी प्रतिक्रिया मला आवडली याबद्दल आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी कॉल केला आहे. त्यानंतर मी जो काही विचार करतो त्यात काही तरी तथ्य आहे याबाबत काही प्रमाणात खात्री झाली. त्या नंतर मी अधून मधून अंगारमळ्यात जाऊ लागलो.
सरांना सोशल मीडियाच्या गैरवापराचा प्रचंड राग आहे. कारण लोक त्याचा सदुपयोग करण्याऐवजी दुरूपयोग करण्यातच अग्रेसर आहेत. सरांचं मला एक वाक्य नेहमी स्मरणात राहील ते म्हणजे, "तुमचं वॉट्सअप्प फेसबुक म्हणजे गटारगंगा आहे". भविष्यात कदाचित वॉट्सअप्प फेसबुकची जागा इतर माध्यमे घेतील परंतु जर दुरुपयोग झाला तर सरांच्या भाषेत त्याची गटारगंगा बनल्याशिवाय राहणार नाही. एका भेटीत त्यांनी मला वॉट्सअप्पवर २ महिन्यांपूर्वी आलेला संदेश दाखवला. तो संदेश पूर्णतः शेतकरी विरोधी होता आणि विशेष म्हणजे त्या संदेशाला आपल्याच एका पाईकाने अंगठा दाखवून उत्तम अशी प्रतिक्रिया सुद्धा दर्शविली होती आणि त्या विरोधात कोणीही प्रतिक्रिया सुद्धा नोंदविली नव्हती . सर मला तो संदेश दाखवत म्हणाले की या असल्या प्रकारामुळे तुमचं वॉट्सअप्प गटार झालंय. जेव्हा वॉट्सअप्पवर एखाद्या विषयावर चर्चात्मक संवाद सुरू व्हायचा तेव्हा तिथे सुद्धा सरांचं काळजीपूर्वक लक्ष असे आणि एखाद्या ठिकाणी मी जर गैरसमजुतीमध्ये असेल तर त्या संबंधित माहिती मला सर मेलवर पाठवून माज्या ज्ञानात भर घालत असत.
मला वाचनाची प्रचंड आवड आहे त्यामुळे मी अंगारमळ्यात कधी गेलो की पुस्तकांच्या अवतीभोवती घुटमळत असायचो. एखादं पुस्तक हाती घ्यायचो आणि त्यातील एक दोन पाने पाहून पुन्हा ठेवायचो आणि हे प्रत्येकवेळी असंच व्हायचं पण मला वाचण्यासाठी पुस्तक मागायची कधी हिंमत झाली नाही. प्रत्येक भेटीत सरांसोबत मी आणि महेश शेती आणि त्या व्यतिरिक्त अध्यात्म - संस्कृती आदि विविध विषयांवर चर्चा करत असे. अनेकदा ते आम्हाला जुनी मासिके , नियतकालिके आणि वर्तमानपत्रातील कात्रणे देत आणि मोठ्याने वाचायला लावत. शरद जोशी साहेबांची युट्यूबवरील शिबिरातील भाषणे मी ऐकली असल्याने माज्या बोलण्यातून साहेबांची अनेक वाक्ये निघत असत. म्हात्रे सर सुद्धा माणसे ओळखण्यात चाणाक्ष आहेत. नेहमीच्या भेटीतून सरांनी माज्यातील लपलेला वाचक आणि लेखक हुबेहूब हेरला होता.
सरांनी मला शरद जोशींच्या मार्क्सवाद या शिबिरातील ध्वनिमुद्रित भाषणाचे लिखित स्वरूपात रूपांतर करण्याचे काम दिले होते. ते मी माज्या पद्धतीने पूर्ण केले ते वाचून सरांना आनंद झाला. त्यात काही त्रुटी सुद्धा जाणवल्या. सरांनी मला या रूपांतर करण्याच्या शास्त्रोक्त पध्दती शिकविण्याचे कबूल केले. भविष्यात कदाचित माझी या कामी संघटनेला मदत होवो अशी सदिच्छा ठेवतो. सर मला प्रत्येक भेटीत काही कात्रणे वाचायला देऊ लागले आणि काही दुर्मिळ पुस्तके सुद्धा वाचून माघारी देण्याच्या अटीवर देऊ लागले. मी जेव्हा जेव्हा माज्या वडिलांकडून ऐकलेल्या संघटनेच्या दुर्मिळ आठवणी सांगायचो तेव्हा ते म्हणायचे की तू हे सगळं लिहून काढ म्हणजे इतरांना देखील शरद जोशींनी संघटनेसाठी घेतलेले कष्ट समजेल. त्यामुळे मला लिखाण करण्याबाबत स्वतःवरील आत्मविश्वास वाढण्यात फार मदत झाली.
म्हात्रे सरांची आणखी एक गोष्ट माज्या लक्षात आली ती म्हणजे त्यांना कधी फोटो काढायला आवडत नाही. फोटो काढायला ते सर्वांना स्पष्ट नकारच देतात. मी एकदा सरांना म्हणलं की तुमचा मला फोटो घ्यायचा आहे तेव्हा सर लगेच उभे राहिले आणि मला म्हणले की तू सुद्धा ये आपण एकत्र फोटो काढू. पण मी नकार दिला आणि म्हणलं की मला फक्त तुमच्या एकट्याचा फोटो हवाय. त्यावेळी बाजूला बबनराव शेलार सुद्धा बसले होते मग त्यांना सुद्धा मी फोटोत येण्याची विनंती केली आणि तेवढीच एकमेव आठवण असलेला फोटो मी टिपला.
असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुष किंवा स्त्रीमागे एक स्त्री किंवा पुरुष असतो किंवा देव धर्म अध्यात्म असते. पण मला हे अजिबात मान्य नाही. मी तर असं ठामपणे म्हणेल की, प्रत्येक यशस्वी व्यक्तिमागे त्याच्या गुणांचे कौतुक आणि अवगुणांचे खंडन करणारी एक सक्षम व्यक्ती असते. शरद जोशी साहेबांना अशाच बुद्धिमान व्यक्तीची साथ लाभली आणि अपेक्षा ठेवतो की मी आणि संघटनेचा प्रत्येक सक्रिय कार्यकारी पाईक "भारतासाठी" म्हात्रे सरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वाटचाल करेल.
पंकज शिवाजी गायकवाड, पुणे
९५९५५२२८५२
pankaj_gaikwad@rediffmail.com
http://pankajsgaikwad.blogspot.com
👌लेखणी
ReplyDelete