सुकाणू समिती बैठक पुणे


माझा जन्म शिक्षण सर्व काही पुण्यातच. माझं गाव चाकण जवळ अगदी १० १२ कि.मी. अंतरावर. मी शरद जोशी कधी प्रत्यक्ष पाहिले नाही किंवा ऐकले नाही याची नेहमी खंत वाटायची. जेव्हा सुकाणू समितीच्या जिल्हावार तारखा जाहीर झाल्या त्या दिवसापासून ठरवलं की आपण तिथे जायचं. पुण्यात अंतिम समारोपाला रविवार २३ जुलै २०१७ रोजी गुलटेकडी मार्केटयार्ड हे ठिकाण निश्चित झालं. मी शरद जोशी सरांची जेवढी शक्य तितकी पुस्तके आधीच वाचून काढली होती. त्यामुळं शरद जोशींचे शिष्य कसे बोलतात कसे विचार मांडतात एवढं पहायची मला खूप उत्सुकता होती. आणि तिथे जाण्यापूर्वी खूप काही प्रश्न सुद्धा तयार करून गेलो होतो की जेणेकरून जर तिथे संवाद झाला तर आपण त्यांना काही विचारू शकतो.

सभेसाठी वेगवेगळ्या गावातून शेतकरी जमले होते. मंडप आणि इतर नियोजन पाहून मी जरा गोंधळून गेलो पण मनात म्हणलं की  इथे राजकीय सभा नाही त्यामुळं इतका विचार करायला नको. व्यासपीठावर अनेक हौशे नवशे स्वयंघोषित शेतकरी नेते जमा झाले होते. त्यापैकी काही सन्माननीय व्यक्ती सुद्धा होत्या. कार्यक्रमाची सुरुवात उत्साहाने झाली पण नंतर कार्यक्रमात रट्याळपणा वाढला. कोणी यायचा आणि संधी साधून भाषण करायचा. हमाल पंचायतचे अध्यक्ष आदरणीय बाबा आढाव त्या वक्त्यांना नम्र विनंती करत होते की आपलं म्हणणं २ मिनिटांत सांगा. पण माईक हातात आल्यावर ऐकतील ते वक्ते कसले!

कार्यक्रम सुरू असताना अनेकदा पावसाच्या सरी येऊन गेल्या पण पावसात भिजणारा एकही शेतकरी आडोसा घेण्यासाठी उठला नाही कारण तो आला होता त्याच्या न्याय्य हक्कांसाठी, हमीभाव आणि कर्जमुक्तीसाठी. एवढ्या भर पावसात शेतकरी बांधव ४ तास बसून राहिले आणि वक्ते बोलतच राहिले. ज्या डाव्या पक्षांनी नेहमी शेतकरी विरोधी भूमिका घेतली त्यांची व्यासपीठावरील उपस्थिती ठळकत होती आणि त्यांच्या लाल बावट्याच्या घोषणा सुद्धा व्यासपीठ गाजवत होत्या.

सुरुवातीला सन्माननीय बाबा आढाव यांनी १४ ऑगस्ट चे आंदोलन कसे करावे याची रूपरेषा मांडली. अगदी सरळ सोप्या शब्दात त्यांनी सत्याग्रही आंदोलनाच स्वरूप मांडलं.  काही वेळाने आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन कसं करावं याबद्दल सांगितलं आणि सोबत मिरची पूड वेगेरे खिशात बाळगण्याचा सल्ला दिला!

व्यासपीठावरून सरकारी योजना कशा मारक आहेत याबद्दल बोललं जाईल असा मला वाटलं होतं. काही अंशी सर्व वक्त्यांनी ते स्पष्ट केले सुद्धा पण काही वक्त्यांनी सरकार वामनांच आहे, मुख्यमंत्री ब्राम्हण आहे, हे सरकार आपल्याला पाडलं पाहिजे अशी घातक विधाने केली. हे मला अजिबात नाही पटलं. देशात इतर पक्षांची सरकारे होतीच की! सरकार बदलून काही साध्य होऊ शकत नाही.  शेतकरी चळवळीचा राजकीय व्यासपीठ म्हणून वावर होतोय अस मला जाणवू लागले.

कोणी कस आंदोलन करावं किंवा कसं आंदोलन असावं याबद्दलचे प्रत्येकाचे विचार स्वतंत्र असू शकतात पण एकाच व्यासपीठावर आंदोलनबाबत दोन वेगवेगळ्या विरोधाभासी संकल्पना मांडल्या जात असतील तर ते चळवळीच्या ऱ्हासाला पोषक वातावरण बनवतं अस माझं स्पष्ट मत आहे.

४ तासानंतर कार्यक्रम संपला तेव्हा मात्र मी बाहेर निघू लागलो. तिथे बाजूला एक शेतकरी नेते भेटले, मी त्यांच्या सोबत काही वेळ चर्चा केली आणि विचारलं की "सर्वजण स्वामिनाथन आयोगाचा आग्रह करत आहेत पण कोणीच शरद जोशी यांच्या मार्शल प्लॅनचा उल्लेख का नाही केला बरं?" त्यांचं उत्तर खूपच चकित करणार होत. "मार्शल प्लॅन असो किंवा स्वामिनाथन आयोग काहीतरी हातात पडू दे आपल्या. एक मंजूर झाला की बाकी घेऊच की आपण".

क्षणभर मीच गोंधळून गेलो आणि निराश होऊन घराकडे पाऊले टाकत निघालो. आणि मनात ठरवूनच टाकलं की स्वर्गीय शरद जोशींच्या शेतकरी संघटने व्यतिरिक्त इतर संघटनांच्या कार्यक्रमाला कधीच हजेरी लावणार नाही.

#माझी_लेखणी
#पंकज_गायकवाड
#सुकाणू_समिती_बैठक

Comments

Popular posts from this blog

सुरेशचंद्र म्हात्रे सर

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

अध्यात्म आणि समुपदेशन