माज्या पत्रिकेतील "पितृदोष"

माज्या पत्रिकेतील "पितृदोष"
https://PankajSGaikwad.blogspot.com

अभियांत्रिकीच्या वापरलेल्या वह्यांची रद्दी चाळत असताना मला त्यात एक ज्योतिषाने पितृदोषाच्या शांती साठी लागणाऱ्या वस्तूंच्या यादीचा कागद सापडला आणि मी लगेचच पाच वर्षांपूर्वीच्या भूतकाळात शिरलो.

अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाचा निकाल लागला, ते वर्ष होत २०१२. मी खूप मेहनत करून अभ्यास केला होता त्यामुळे पास(!) होण्याची निश्चितच खात्री होती. निकाल लागला! आणि खरंच माझा निकाल लागला व ४ विषयांसोबत मी नापास झालो. अभियांत्रिकीला नापास होणे म्हणजे काही विशेष गोष्ट नसते परंतु अभ्यास करून जर नापास झालात तर ती फारचं वेदनादायक गोष्ट असते हे कोणताही अभियंता सांगू शकेल. खरं वाईट तेव्हाच वाटत की जेव्हा तुम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र अभ्यास करून तुमचे सर्व मित्र उत्तीर्ण होतात आणि फक्त तुम्ही एकटे नापास होतात, खरंच फारच वेदनादायी असतं!

त्यानंतर आलेले अनुभव हा माज्या आयुष्यातील सुवर्णकाळ मानतो मी. आपले मित्र आपल्याला कसा सल्ला देतात सहकार्य करतात त्यातून आपण कसे शिकत जातो हे महत्त्वाचं. असंच नापास का झालो म्हणून दिवसभर चिंतन करत असताना मी आमचा जिगर मित्र दीपकला सांगितलं की आपण ज्योतिषाकडे जाऊन पत्रिका दाखवू आणि पाहू की नक्की काय भानगड झाली की ज्यामुळे मी अभ्यास करून नापास झालो. माझी मानसिक अवस्था पाहून त्याने सुद्धा क्षणात होकार दिला आणि पुढच्याच एक तासात आम्ही ज्योतिषाच्या कार्यालयात पोहोचलो. कार्यालयात समस्याच निराकरण करण्यासाठी अनेक लोक रांगेत बसले होते. त्यांच्या सोबत आम्ही सुद्धा रांगेत जाऊन बसलो आणि आमच्या समोर ज्योतिषी बसले होते. मला वाटलं की त्यांना मनातलं कळत असावं म्हणून मी कसतरी मनावर ताबा मिळवत शांत बसलो.

माझी जन्मतारीख वेळ विचारून त्यांनी माझी लॅपटॉपवर कुंडली बनवली आणि मला सांगितलं की तुमच्या पत्रिकेत पितृदोष आहे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात अडथळे येतात. यावर उपाय काय असे विचारले असता त्यांनी मला पितृदोष शांती करण्याचा सल्ला दिला व शांती केली तर सहा महिन्यांत सर्व काही सुरळीत होईल असं सांगितलं आणि त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा तपशील आणि त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी माज्या हातात सोपविली. त्या दिवशी रात्री मी घरी येऊन आमच्या आण्णांना म्हणजे माज्या वडिलांना सर्व वृत्तांत सांगितला. आण्णांकडून समजलं की ती शांती माज्या मोठ्या बहिणीसाठी यापूर्वीच केली आहे. आणि ती शांती पुन्हा करण्याची गरज नाही. आता पुन्हा निर्माण झाला नवीन पेच! काय करावं काही कळेना.

दुसऱ्या दिवशी सर्व मित्रमंडळींची माज्यासाठी समुपदेशन आणि सांत्वनपर "चाय पे चर्चा" कट्टयावर सुरू झाली. अपेक्षेप्रमाणे तिथे केंद्रस्थानी मीच होतो. तिथे जे सल्ले मिळाले त्यांचा वापर तर मी केलाच आणि त्यातून जर काही मिळवलं ते आयुष्याची पुंजी म्हणून आजसुद्धा सोबत ठेवलंय. प्रियांकाने सुरुवात केली आणि पहिला मोलाचा सल्ला दिला की तुझं अक्षर खूप घाणेरडं आहे आणि कोणी वाचू सुद्धा शकत नाही. त्यामुळे तू काळ्या शाईचा पेन टाळून निळ्या शाईचा वापर आणि अक्षर शक्य तितके मोठे काढ. दुसरा सल्ला स्नेहल कडून आला, तिने तिच्या सूत्रांकडून माहिती काढली होती. आणि तिचं सुत्रांचं जाळ किती मजबूत आहे हे मला त्या दिवशी समजलं. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मी परीक्षेच्या वेळी काही येत नसेल तर शांत बसून असतो पण काही लिहीत नाही. निव्वळ बसून राहण्याऐवजी जे काही मनात असेल ते लिहून काढत जा भले ते चुकीचं असुदेत पण शांत बसून राहू नकोस. मला तिचासुद्धा सल्ला पटला आणि पुढच्या परीक्षेत प्रियांका व स्नेहलचा सल्ला वापरण्याचा मी निर्धार पक्का केला. दिपकला कदाचित तिथे काही सुचवायचं नसावं त्यामुळे त्याने फक्त चहाच्या आस्वादावर लक्ष केंद्रित केलं होतं.

चर्चेची समाप्ती झाल्यावर दीपक मला घेऊन तडक त्याच्या वसतिगृहावर घेऊन गेला. तिथे गेल्यावर अभ्यास कसा केला पाहिजे आणि त्या अभ्यासाचं वेळेच्या नियोजन सोबत सराव कसा झाला पाहिजे याबद्दल समजावू लागला. अगदी तो कसा रोज सराव करतो याबाबद्दल सुद्धा त्याने त्याची पुस्तके आणि वह्या उघडून दाखविल्या, महागडे पेन वापरल्यामुळे लिखाणाचा वेग कसा कमी होतो हेसुद्धा दाखवलं. तेव्हाच मी त्याने सांगितलेल्या सर्व सूचना एकत्र करून अमलात आणायचं ठरवलं. दिपकचा निरोप घेताना मी त्याला वचन दिलं की मी तुम्ही सर्वांनी दिलेल्या सूचनांचे येणाऱ्या परीक्षेत तंतोतंत पालन करील आणि हे सर्व करून जर मला अपेक्षेपेक्षा चांगले गुण आले तर मी आयुष्यात कधीच कोणत्याही ज्योतिषाकडे जाणार नाही.

तिसऱ्या वर्षाचा निकाल लागला मी सर्व विषयात चांगले गुण घेऊन पास झालो होतो आणि अंतिम वर्षात सुद्धा अभ्यासाची हीच पद्धती वापरून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो होतो. दीपकला दिलेल्या वचनाप्रमाणे मी आजतागायत कोणत्या ज्योतिषाला माझं भविष्य विचारलं नाहीये किंवा पुढे सुद्धा विचारणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे.

तुमचं आयुष्य हे काही तुमची पत्रिका घडविणार नाहीये. ते तुम्हाला घडवायचय तुमच्या अनुभवाच्या शिदोरी मधूनच. माज्या मित्र सवंगाड्यांनी दिलेले सल्ले अमलात आणून आज मी इथे जीवनात सुवर्णकाळ उपभोगत आहे . जुन्या अडगळीतील निरुपयोगी कागदपत्रांची रद्दी जुळवताना मी तो ज्योतिषाने दिलेला कागद सुद्धा पाच रुपये प्रति किलो भावाने रद्दीत सुद्धा विकून टाकला. कदाचित त्याची तितकीच किंमत होत असावी...

#माझी_लेखणी
#माज्या_पत्रिकेतील_पितृदोष
#पंकज_गायकवाड
https://PankajSGaikwad.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

सुरेशचंद्र म्हात्रे सर

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

अध्यात्म आणि समुपदेशन