गायत्री

पु ल देशपांडे यांच्या रावसाहेब पुस्तकातील हा समास मला नेहमीच आवडतो, "एखाद्या माणसाची आणि आपली wavelength का जमावी आणि एखाद्याची का जमू नये ह्याला काही उत्तर नाही. १५-१५, २०-२० वर्षाच्या परिचयाची माणसे असतात पण शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापलिकडे त्यांचा आपला कधी संबंध जात नाही. त्यांच्या घरी जाण होत भेटणं बोलणं होत. पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि काही माणसं अगदी क्षणभरात जन्म जन्मांतरीच नातं असल्याप्रमाणे दुवा साधून जातात. वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही, पूर्वसंस्कार, भाषा, चवी आवडी निवडी कशाचाही आधार लागत नाही. सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात."

आज गायत्रीचा ऑफिसमधील एक सहकारी म्हणून शेवटचा दिवस त्यामुळे वाईट तर वाटणारच. ऑफिसमध्ये पोहोचल्यापासून ते ऑफिसच्या बाहेर पडेपर्यंत माज्या तोंडून फक्त दोन व्यक्तींच्या नावांचा सर्वात जास्त जप केला जातो त्या दोन व्यक्ती म्हणजे गायत्री आणि ओंकार. या दोघांमुळे मला कधी कामात कोणती अडचण जाणवली नाही. गायत्री अशी आरोळी ठोकली की पुढच्याचं क्षणी ती माज्या बाजूला येऊन उभी दिसणारच! त्यापैकी एक नाव उद्यापासून नसणार माज्या तोंडी. "भावा, कसा आहेस?", "भावा, आज वेळेवर कसा आलास?","काय issue केलास रे भावा तू, जाऊदे मी घेतलंय ते सांभाळून" या ओळी सुद्धा कानावर पडणार नाहीत. आज कॅम्पस मधून निरोप घेताना सुद्धा सर्वांना उद्देशून म्हणाली "हा भाऊ आहे माझा!"

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करताना तुम्हाला जिवलग मित्र-मैत्रिण, प्रियकर-प्रेयसी किंवा फार तर नवरा-बायको अशा अनेक जोड्या सहज नजरेत पडतील. पण बहीण भावाच्या जोड्या सापडणे हा दुर्मिळच योग! गायत्री आणि माझं आजोळ गाव एकाच तालुक्यातील एवढा दुवा पकडून आम्ही एकमेकांचे बनलो बहीण भाऊ. एकमेकांच्या घरच्या स्वयंपाकाची चव, घरातील चालीरीती, कुटुंबियांच्या सवयी या इतक्या तंतोतंत कशा काय जुळतात हा आम्हा दोघांना नेहमीच पडलेला यक्ष प्रश्न असतो. कदाचित त्यामुळेच तिला नेहमी असं वाटतं की मीच तिच्या लग्नासाठी सुयोग्य "वर" सुचविला पाहिजे. तसं हक्काने बोलते देखील की "माज्यासाठी चांगलं स्थळ शोधतोस की नाही?"

गायत्री सध्याच्या प्रोजेक्टमध्ये मला दोन वर्षाने वरिष्ठ सहकारी आहे. त्यामुळे मला प्रत्येकवेळी तिची मदत हवीच असते. पण ती कधीच मला सहकारी वाटली नाही आणि तिने तसं दाखवलं देखील नाही. प्रत्येकवेळी गायत्री मला लहान बहिणी प्रमाणेच वाटते. माज्यासोबत बोलताना देखील ती तिच्या मोठ्या भावासोबत बोलत असल्याचा भास होतो. ऑफिसच्या कॅम्पसमध्ये माज्यासोबत बोलताना चालताना देखील लहान बहिणीप्रमाणे वावर असतो आणि तितकाच आदर देखील असतो.

उद्यापासून तिघांपैकी ओंकार आणि मी एकटेच असणार गायत्री नसणार. पण एवढं नक्की ठाऊक आहे की आपण सर्वजण पुन्हा एकत्र येणार. कारण आपलं दूरसंचार क्षेत्रच इतकं छोटं आहे की सर्वांना फिरून फिरून एकत्र येण्याशिवाय मुभा नसतेच. तुला तुज्या भावी कारकिर्दीसाठी आणि लग्नासाठी देखील मनःपूर्वक शुभेच्छा...💐💐💐

Comments

Popular posts from this blog

सुरेशचंद्र म्हात्रे सर

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

अध्यात्म आणि समुपदेशन