मी, माझं गव्हाचं शेत आणि निवेदिताचा वाढदिवस






तब्बल आठ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे २३ डिसेंबर २०१० रोजी मी माज्या आजोळगावी केंदूरला आमच्या शेतात गव्हाच्या पिकाला पाणी भरत होतो. सकाळचे ११ वाजले होते. अचानक निवेदिताचा मला कॉल आला आणि माज्यावर ती रागावली,"माझा आज वाढदिवस आहे आणि ठरल्याप्रमाणे सर्वजण केक कापण्यासाठी उपस्थित आहेत. फक्त तू नाही आलास." मी सांगितलं की शेतात आहे, गव्हाला पाणी देतोय त्यामुळे येऊ शकलो नाही. मी गेलो नाही म्हणून निवेदिता कॉलवर रडत होती. तिचं रडणं ऐकून मला अगदी अवघडल्यासारखे झाले. मी खूप मोठी चूक केल्यासारखं वाटू लागलं. त्या क्षणी माझा अवतार असा होता की चिखलाने माखलेले कपडे आणि हातात फावडे घेऊन पाण्यात उभा राहून कॉलवर बोलत असलेला मी  हातातले काम सोडून मी जाऊ सुद्धा शकत नव्हतो. कारण शेतीसाठी आठवड्यातून फक्त दोन दिवस वीजपुरवठा व्हायचा. त्या दिवशी जर पाणी दिलं नाही तर मला एक आठवडा थांबावं लागलं असतं किंवा मला मध्यरात्री कडाक्याच्या थंडीत जागून पाणी द्यावं लागलं असतं आणि पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झालं असतं.

लगेचच तिने मला कॉलवर धमकीवजा इशारा दिला की,"तू एक तासात इथे पोहोच, त्याशिवाय मी केक कापणार नाही. जर तू नाही आलास तर आपली मैत्री कायमची तुटली असं समज!" मी अगदी गोंधळून गेलो की शेतात थांबू की तिकडे जाऊ! मी नेहमी सर्वांना आवडेल अशीच आश्वासने द्यायचो. नेमकं त्या दिवशी मी तिला पहिल्यांदा कठोर होऊन उत्तर दिलं की, "मी शेतकरी आहे आणि सुख दुःख विसरून शेतात काम करणं हेच आमचं जीवन असतं. त्यामुळे मी येऊ शकत नाही, मला गव्हाचं पिक महत्वाचं आहे! आणि माझं उत्तर ऐकून तिने रागावून कॉल बंद केला. तिकडे तिने दुःखात तिचा वाढदिवस साजरा केला आणि मी इकडे तेवढ्याच दुःखात शेतात पाणी भरत राहिलो.

निवेदिताने काही दिवस दिवस माज्यासोबत अबोला धरला आणि झालं गेलं विसरून पण त्या घटनेचा माज्याबाबत "मजेशीर राग" मनात ठेऊन पुन्हा गट्टी जमवून बोलू सुद्धा लागली. त्यानंतर मी जेव्हा जेव्हा तिच्या घरी जायचो तेव्हा तेव्हा ती तिच्या आई-बाबांना माझी नेहमीच तक्रार करायची की हा गव्हाच्या शेतात थांबून राहिला पण माज्या वाढदिवसाला आला नाही. अगदी त्या घटनेला ३ ४ वर्षे होऊन गेली तरी ती हा दिवस विसरली नाही आणि प्रत्येक वाढदिवशी ही आठवण काढून अजूनही माज्यावर हक्काने रागावते. मी प्रत्येकवेळी समजावत राहिलो की माझी भूमिका कशी योग्य होती आणि ती सुद्धा तिच्याच भूमिकेवर ठाम राहिली आणि आजसुद्धा ठाम आहेच.

पूर्वाश्रमीची कु निवेदिता हनुमंतराव पांचाळ कालांतराने सौ निवेदिता राहुल सुतार झाल्या. जेव्हा तिने तिच्या "अहो" सोबत ओळख करून दिली तेव्हा सुद्धा हेच सांगितलं की हाच तो पंकज जो माझा वाढदिवस सोडून गव्हाच्या शेतात पाणी भरत होता. निवेदिताला आज एक खट्याळ गोंडस कन्या आहे तिचं नाव गिरीजा. गिरीजा जेव्हा मोठी होईल तेव्हा सुद्धा माझी ओळख ती वाढदिवस चुकवून शेतात पाणी भरणारा पंकज अशीच करून देईल. इतकंच काय तर निवेदिता तिच्या नातवंडांना सुद्धा माझी हीच ओळख सांगेल याबाबत मला पूर्ण खात्री आहे.

निवेदिता आणि माझा संपर्क नसल्या प्रमाणेच आहे. २०१८ वर्ष संपले तरी सुद्धा आम्ही अजूनही भेटून एकमेकांसोबत मनसोक्त गप्पा टप्पा सुद्धा झाल्या नाहीत. पूर्ण वर्षभरात ३ वेळा कॉलवर बोलणं झालं असेल. इतका संपर्क तुटला तरी सुद्धा रागावली का नाही हाच मला पडलेला प्रश्न आहे! माज्या कोणत्याही प्रकारच्या बोलण्याचा अजिबात राग ना येणाऱ्या आणि हक्काने माज्यावर रागावणाऱ्या भांडणाऱ्या रुसणाऱ्या आणि माज्या प्रत्येक भूमिकेसोबत ठाम उभ्या राहणाऱ्या काही मोजक्या व्यक्ती पैकी एक म्हणजे निवेदिता. तिच्या बाबत लिहायला गेलो तर त्या लिखाणाचा एक ग्रंथ नक्कीच बनेल. इथे सर्व काही लिहू सुद्धा शकत नाही. जेव्हा मी माज्या जीवनातील मजेशीर अफलातून घटना आणि आठवणींचा संग्रह करेल तेव्हा निवेदीता सर्वात जास्त जागा व्यापून घेईल.

लिहायला खूप मजेशीर आठवणी आहेत. पण उरलेल्या आठवणी पुढच्या वेळी. आज तुझा जन्मवाढदिवस आहे त्यामुळं तुला आभाळभर, आरोग्यदायी शुभेच्छा...💐💐💐








Comments

Popular posts from this blog

सुरेशचंद्र म्हात्रे सर

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

अध्यात्म आणि समुपदेशन