२२ मे २०२१ च्या शनिवारी पहाटे मोबाईल वर अभिमन्यू दादांचा मेसेज येऊन धडकला "पप्पा गेले"! मेसेज वाचून धक्का बसला आणि पुन्हा फोन करून सांत्वन करण्यासाठी काय बोलणार हादेखील प्रश्न पडला. कारण बबनराव शेलार यांनी आपलं आयुष्य जसं स्वातंत्र्याचा उपभोक्ता म्हणून व्यतीत केलं मग त्यांच्या बौद्धिक वारश्याने संपन्न आणि पराकोटीची प्रगल्भता असलेल्या चिरंजीवांचं सांत्वन देखील कोणत्या शब्दात करणारं! अगदी सहज मनात आले की आज शरद जोशी असते तर त्यांनी शेतकरी संघटकच्या संपादकीयमध्ये "हुरहुन्नरी सोबती बबन गेला..." या आशयाचा अग्रलेख नक्कीच लिहिला असता.


बबनराव शेलार म्हणजे एका सरंजामी देशमुख परंपरेचा वारसा लाभलेले परंतु शेतीतील सततच्या तोट्यामुळे अठराविश्व दारिद्र्याला सोबतीला घेऊन वाटचाल करणारे कुटुंबप्रमुख. स्वातंत्र्याची मूल्ये बहुदा त्यांच्या रक्तातच भिनुन आली असावीत. तुम्हाला बुद्धिवंत अथवा विचारवंत होण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज लागत नाही हे बबन काका यांच्याकडे पाहूनच समजते. जेमतेम लीहिण्या-वाचण्यायोग्य शिक्षण असलेले बबन काका एक चालते फिरते विद्यापीठ आणि उत्तम निरीक्षक होते. व्यक्तीकडे शिकण्याची भूक असेल तर ती भूक त्याला उच्च स्थानावर नक्कीच नेऊन ठेवते आणि ते स्थान बबन काकांनी मिळवून दाखवले होते.

गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडून वाहन चालक बनलेले बबनकाका नोकरी करत असतानावाचनापासून कमालीचे दुरावले होते. त्यांच्या गावातच राष्ट्रसेवा दलाचे समाजवादी नेते भास्कर भाऊ बोरावके वास्तव्यास होते. त्यांच्या घरी राज्यातील महत्वाच्या नेत्यांची बैठक असे. भाऊंकडे पुस्तकांचा संग्रह देखील होता. त्यामुळे बबन काकांनी स्वतःची नोकरी सोडून भास्कर भाऊ यांच्याकडे अर्ध्या पगाराची चालकाची नोकरी स्वीकारली. यामुळे ते स्वतःचा वाचनाचा छंद देखील जोपासू लागले आणि भाऊंच्या घरी येणाऱ्या नेत्यांच्या चर्चा देखील ऐकू लागले आणि त्यातून पुढे जाऊन वैचारिक प्रगल्भ झाले. तारुण्यातचं वाचनाचं व्यसनं जडलेले बबन काका हे एक अवलिया होते. कोपरगाव येथे ग्रंथालयात जाऊन सावरकर यांचे पुस्तक मागितले तेव्हा ग्रंथपाल आश्चर्यचकित झाले. पुढच्या वेळी त्यांनी आफ्रिकन युवकाने चिनी क्रांती बद्दल लिहिलेले पुस्तक मागितले तेव्हा ग्रंथपाल त्यांच्या पुढे अक्षरशः हात जोडून उभे राहिले होते. पुढे जाऊन शरद जोशी आणि भास्कर भाऊ बोरावके यांची कौटुंबिक मैत्री झाली आणि भाऊ देखील शेतकरी संघटनेत सामील झाले. बबनराव यांनी कोपरगाव मध्ये गनिमी काव्याने केलेली शेतकरी आंदोलने पाहून भारावलेले शरद जोशी यांनी शेलार कुटुंबाला स्वतःसोबत अंगारमळ्यात आंबेठान येथे घेऊन आले. बबनराव शेलार म्हणजे शरद जोशी यांच्या स्वप्नातील आदर्श शेतकरी होते. ज्यांनी शेतीचा त्याग करून स्वतःच्या कुटुंबाला शेतीतून बाहेर काढून कुटुंबाचा उत्कर्ष केला. अभी दादा नेहमी म्हणतात की आम्ही जर आमच्या जातीचा फाजील आत्मविश्वास ठेऊन शेतीत राबत बसलो असतो तर आमचं दारिद्र्य पुढच्या पिढ्यांना नक्कीच हस्तांतरित झालं असतं.

बबन काका आणि माझं प्रत्यक्ष कधीच संभाषण झालं नाही. कारण मी जेव्हा पासून अंगारमळ्यात जात आहे तेव्हापासून त्यांना स्मृतीभंश आजाराने ग्रासले असल्याने आम्ही फक्त एकमेकांना नजरेने पाहत असे. त्यांचा चेहरा इतका बोलका असे की प्रत्येक भेटीत मी त्यांच्या समोर येताच त्यांना तब्येतीची विचारपूस करत असे कारण समोर येताच जाणवत असे की ते आपल्याशी बोलू पाहत आहेत पण त्यांच्याकडून कधीच प्रतिसाद मिळत नसे. शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठ पाईकांना ठाऊक असे की त्यांना काय आवडतं. त्यामुळे अनिल मालपाणी वाशिमवरून अंगारमळ्यात आल्यावर नेहमी त्यांच्या आवडीची गोष्ट सोबत घेऊन येत आणि त्यांना देत. त्याक्षणी त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा प्रफुल्लित आनंद पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे. अभिमन्यू दादा नेहमी म्हणतात की माझे पप्पा जर या आजाराने ग्रासले नसते तर तुम्ही लोकं माझे मित्र झालेच नसते. पप्पांसोबतच तुमची घनिष्ठ मैत्री जमली असती.

बबन काका यांची निरीक्षण शक्ती अफाट होती. शरद जोशींना अनेक लोक भेटायला येत. भेटायला आलेल्या पाहुण्यांना कुठे कसं बसावे याचे सक्त निर्देश ते देत असत. त्यात अनेक हौशे नवशे देखील असतं. मग त्यातील चमकोगिरी करणाऱ्या लोकांना फिरकी घेऊन उघंड करण्यात बबन काकांचा हातखंड कोणी धरू शकत नव्हते. शरद जोशी यांच्यासोबत फक्त बबन काका हक्काने भांडत असत त्यामुळे जोशींना देखील बबन काका विषयी आदरयुक्त भीती होती. शरद जोशी कुठे चुकले तरी अगदी त्यांच्यावर रागवायचा देखील अधिकार बबन काकांनी राखून ठेवला होता.

बबन काका यांच्या सोबत जरी कधी चर्चा करण्याचा योग आला नसला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू म्हात्रे सरांकडून सोप्या भाषेत उघड होतात. म्हात्रे सर म्हणतात की, "बबन कोणाला कळला नाही तर ज्याने त्याच्याकडे फक्त ड्रायव्हर याच नजरेने पाहिले! बबनचं एक स्वतःच वेगळं अर्थशास्त्र आहे. जर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन बटाट्याची साल खाण्यासाठी मागवली तर जितके बटाटे वापरून ती साल वेगळी केली तितक्या बटाट्याच्या किमतीचे पैसे तुम्हाला बिल म्हणून द्यावे लागतील."

१२ डिसेंबर २०२० रोजी अंगारमळ्यात शरद जोशी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी गेलो असता बबन काकांची भेट झाली. तीच आमची शेवटची भेट! तेव्हा ते सक्तीची विश्रांती घेत होते. जणू काही झेप घेण्यासाठी सज्ज असलेला जंगलाचा राजा वाघ हा गुहेत थकल्या पावलाने नाईलाजाने विश्रांती घेत होता. तेव्हा लीला मावशी यांनी मला रातराणी वेलीच्या काड्या घरी बगीचात लावण्यासाठी दिल्या होत्या. मावशींनी दिलेली रातराणीची वेलं कधीच उमलली नाही आणि काही दिवसांनी मात्र त्या वेलिकडे पाहत असताना रात्र सरण्यापूर्वीच बबन काका गेल्याची बातमी आली!

शरद जोशी, म्हात्रे सर आणि बबन काका या तीन व्यक्ती म्हणजे अंगारमळ्याचं वैभव वाढविणाऱ्या विभूती आहेत. माझ्या पिढीला यांच्या सक्रिय जीवनाचा किमान सहवास लाभला याबाबत मी स्वतःला कमनशिबी समजतो. पण त्यांनी सादर केलेला वैचारिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्या पिढीवर आहे याचादेखील अभिमान वाटतो. सहा वर्षे पूर्वी शरद जोशींच्या जाण्याने कोमेजून गेलेला अंगारमळा आज पुन्हा एकदा शोकसागरात बुडाला आहे . ही सर्वात मोठी वैचारिक हानी झाली आहे. त्यांनी दिलेल्या वैचारिक ठेव्यातून अनेक बबन काका सारखे बुद्धिमान विचारवंत तयार होवोत हीच श्रद्धांजली आज योग्य ठरेल!

पंकज गायकवाड
९५९५५२२८५२






Comments

Popular posts from this blog

सुरेशचंद्र म्हात्रे सर

शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान

अध्यात्म आणि समुपदेशन